वाशिम : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रस्तावित चिवरा (ता.मालेगाव) येथील जागा कायम ठेवण्याच्या मागणीसाठी २२ ऑगस्ट रोजी चिवरा येथील नागरिकांनी वाशिम-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील झोडगा फाट्यावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले.
राज्यातील वाशिमसह ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नवी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबतचा जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांकडे सादर केला होता. वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील गट क्रमांक २३८ मधील १५.३९ हे. आर,, गट क्रमांक २८२ मधील ८.९९ हे. आर. आणि गट क्रमांक २८४ मधील ६.५३ हे. आर. मिळून एकूण ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमिन प्रस्तावित करण्यात आली. २८ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली.
दरम्यान, चिवरा येथील जागा बदलून अन्य ठिकाणचे प्रस्तावदेखील राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवरून ‘राजकारण’ रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. चिवरा येथील प्रस्तावित जागा कायम ठेवण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र हलविण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी चिवरा येथील नागरिकांनी २२ ऑगस्ट रोजी झोडगा फाट्यावर रास्का रोको आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.