वाशिम : कीटकनाशक, तणनाशके फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी सुरक्षा कीटचा वापर करणे आवश्यक आहे. फवारणीचे काम करणाऱ्या मजुरांची तालुकानिहाय यादी तयार करावी तसेच गावोगावी फवारणीविषयक जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १२ ऑगस्ट रोजी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १२ ऑगस्ट रोजी कीटकनाशक विषबाधाप्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याविषयीची माहिती स्थानिक कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी, फवारणी करणारे मजूर यांच्यापर्यंत पोहचवावी, असे त्यांनी सांगितले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी तसेच फवारणी केल्यानंतर काय काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रासायनिक खत, औषध विक्रेते, उत्पादक कंपन्या यांनी सुद्धा पुढाकार घेऊन जनजागृती करावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनीदेखील यावेळी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली.
००००००००००००००००००
अशी आहेत विषबाधेची लक्षणे
फवारणी करताना अशक्तपणा अथवा चक्कर आल्यासारखे वाटणे, त्वचेची व डोळ्यांची जळजळ होणे, डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, धाप लागणे किंवा छातीत दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित फवारणी बंद करावी व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.