लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतर, दीड लाख मर्यादेपर्यंत किती शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येतील, याची आकडेवारी घेण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. आकडेवारी हाती येण्यास प्रचंड विलंब होत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयातील तरतुदी, अटी व शर्तीचा अभ्यास केल्यानंतर बँक प्रशासन व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पात्र शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे; मात्र अद्याप निश्चित आकडेवारी हाती येत नसल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी नेते व पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे दिसून येते. सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या कालावधीत पीक कर्जाची उचल करणारे; परंतु ३० जून २०१६ रोजी कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांचा निश्चित आकडा किती आहे, यामध्ये दीड लाख मर्यादेपर्यंतचे शेतकरी किती, यापैकी नोकरदार व निकषानुसार अपात्र शेतकरी किती, याचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २४ हजार ३३५ अशी आहे. या शेतकऱ्यांकडे ९७ कोटी २३ लाख रुपयांच्या आसपास कर्ज थकीत आहे. यापैकी २३ हजार ५३१ शेतकरी हे दीड लाख रुपये कर्जमाफीच्या कक्षेत येतात. यापैकी किती शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत झाली, याचा लेखाजोखा अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला याद्या प्राप्त झालेल्या नाहीत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्यादेखील अप्राप्तच आहेत. बँकांकडून अधिकृत माहिती मिळत नसल्याने शेतकरीदेखील संभ्रमात आहेत. यादी तयार होण्याला विलंब होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला अद्यापही सुरुवात झाली नसल्याची माहिती आहे. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जवळपास ९० टक्के काम पूर्णत्वाकडे आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे ५० ते ६० टक्क्यादरम्यान यादी बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या काही दिवसातच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती पूर्णत्वाकडे येईल. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम.
यादी बनविताना दमछाक!
By admin | Published: July 11, 2017 2:02 AM