मालेगाव : मालेगाव नगर पंचायतच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला अवघे पाच महिने उरले आहेत. कोरोनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार असल्याने, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर नगर पंचायतमध्येही प्रशासक नेमले जाणार की मुदतवाढ मिळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.नगर पंचायतच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या पाच महिन्यात संपुष्टात येणार आहे. संभाव्य निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी कोरोनाच्या परिस्थितीत मदतीचा हात देत अप्रत्यक्षपणे प्रचार यंत्रणा अलर्ट केल्याचे दिसून येते. १७ प्रभागात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आतापासूनच प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या दिवसेदिवस वाढु लागली आहे. नगर पंचायतची सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसल्याचेही दिसून येते. दुसरीकडे कोरोनामुळे निवडणूक होणार की नाही याबाबतही साशंकता वर्तविली जात आहे. ग्रामपंचायतींवर जसे प्रशासक नेमले जाणार आहेत; त्याच धर्तीवर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर नगर पंचायतची निवडणूक न घेता प्रशासक नेमला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगत आहे. दुसरीकडे विद्यमान सदस्यांना मुदतवाढही मिळू शकते किंवा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर पाच महिन्याने निवडणुकही होऊ शकते, असाही मतप्रवाह आहे. निवडणूक झाली नाही तर इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाणार, हे मात्र निश्चित.
पाच महिन्यात समस्या निकाली काढण्याचे आव्हानशहरातील ३६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, लहान मुलांकरता बगीचा, सुसज्ज व स्वच्छ असा आठवडी बाजार, शहरात प्रमुख ठिकाणी मुत्रीघर व शौचालयाची व्यवस्था, नाली बांधकाम आदी प्रमुख समस्या कायम आहेत. पाच महिन्यात या समस्या निकाली काढण्याचे आव्हान विद्यमान सदस्यांना पेलावे लागणार आहे.