मालेगाव (वाशिम) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी, २५ हजारांपेक्षा अधिक शहरवासीयांना आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असून लवकर प्रभावी उपाययोजना न केल्यास पाण्यासाठी हाहा:कार माजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजारांपेक्षा अधिक असून कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून शहरास पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पर्जन्यमान घटण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे धरणातून अवैधरित्या पाणी उपसा झाला. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. सद्या तलावात पुढील एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.दरम्यान, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मालेगावला चाकातिर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पुरक पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नगर पंचायतने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यास मात्र अद्याप मंजुरात मिळाली नसून आगामी महिनाभरात प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मालेगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चाकातिर्थ लघुपाटबंधारे तलावातून कुरळा लघुपाटबंधारेच्या विहिरीत पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या पुरक पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी १० लाख रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव जिल्ह्याधिकाºयांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचा चाकातिर्थ ते मालेगाव शहर असा ३४ कोटी रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन्ही प्रस्तावांना मात्र अद्याप शासनाची मंजुरात मिळालेली नाही.- मीनाक्षी परमेश्वर सावंत, नगराध्यक्ष, मालेगाव