- धनंजय कपाले
वाशिम : महावितरण कंपनीने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन न करता व ग्राहकांचा अर्ज नसतानाही वीज बिलामध्ये दुरूस्ती करणे तसेच कंपनीने ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्तही विद्युत बिलामध्ये दुरूस्त्या केल्याने महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी निम्नस्तर लिपीक (लेखा) गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
गणेश गोविंदराव घुगे यांचेकडे मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा व मेडशी (पी.सी. क्र. ३ व ४) या परिसरातील विद्युत देयक संदर्भातील कामकाजाची जबाबदारी सोपविलेली होती. ही जबाबदारी पार पाडत असताना घुगे यांनी ‘गैरकृत्य’ केल्याचे वरिष्ठ अधिकाºयांच्या निदर्शनास आले. घुगे यांनी मिटर वाचन एजन्सीद्वारे सादर करण्यात आलेल्या मिटर वाचन सि.डी. चे तपासणी न करता आय.टी. विभागास सादर केल्याचे आढळून आले. त्यामुळे नॉर्मल बिलींगची टक्केवारी कमी होऊन फॉल्टी, आर.एन.ए. ,इनअसेस, आर.एन.टी. चे प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाली. असे असतानाही ही बाब घुगे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन न दिल्यामुळे त्यांचे मिटर रिडींग एजन्सीशी संगनमत असल्याचे उघडकीस आले.
याशिवाय वितरण कंपनीच्या ग्राहकांना देण्यात येणाºया देयकामध्ये अवास्तव रिडींग टाकने किंवा चालु मिटर असलेल्या ग्राहकांचे मिटर फॉल्टी दाखावून त्यांना देयक देणे. त्यानंतर संबंधीत सहाय्यक अभियंता यांच्या एस.आय. आर. रिपोर्ट व संबंधीत ग्राहकांचा अर्ज नसतांनासुध्दा ग्राहकाची वीज देयके परस्पर दुरूस्त करून देण्यात आल्याची गंभीर बाब आढळून आली.
कंपनीने ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रातील विज बिल दुरूस्ती ही संबंधीत ग्राहकाचा अर्ज नसताना, सहाय्यक अभियंता यांचा स्थळ परिक्षण अहवाल नसताना, मिटर फास्ट असल्यास मिटर टेस्टरचा अहवालाची पडताळणी न करता बिलाामध्ये दुरूस्त्या करण्यात आल्या. याव्यतिरक्ति घुगे यांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेरीलही विद्युत बिलामध्ये दुरूस्त्या केल्याची गंभीर बाब उघडकीस आली.
या सर्व प्रकारामुळे मालेगाव उपविभागाचे माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीतील १२.८२ कोटी रूपये एवढी मागणी अपेक्षीत आहे. असे असताना त्या तुलनेत २.३१ कोटी रकमेची क्रेडीट ग्राहकांच्या बिलामध्ये करण्यात आलेली आढळून आली. यामुळे महावितरण कंपनीला २.३१ कोटी रूपये एवढे महसुली नुकसान झाल्याचा अहवाल तपास यंत्रणेणे कार्यकारी अभियंत्यांना सोपविला. या अहवाला नुसार गणेश घुगे यांचे हे कृत्य सेवाविनियमातील तरतुदी नुसार गंभीर स्वरूपाचे आढळून आले. या गैरप्रकारामुळे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी गणेश गोविंदराव घुगे यांना निलंबीत ेकेल्याची बाब १३ एप्रिल रोजी उघडकीस आली.
मालेगाव उपविभागात लिपीक पदावर कर्तव्यावर असलेले गणेश घुगे यांनी केलेल्या गैरकृत्यामुळे वितरण कंपनीचे सुमारे २.३१ कोटी एवढे महसुली नुकसान झाले आहे. त्यामुळे घुगे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
- व्ही. बी. बेथारीया, अधिक्षक अभियंता, वाशिम
ग्राहकांचे पैसे उकळणारी यंत्रणा कार्यरत
जिल्ह्याभरात कार्यरत असलेल्यापैकी काही विशिष्ठ लाईनमन व विशिष्ट लिपीक यांनी गैरमार्गाने पैसे कमविण्यासाठी आपली एक विशिष्ट यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेतील काही महाभाग ग्राहकाकडून विद्युत देयकाची रक्कम वसुल करतात. विशेष म्हणजे संबंधीत ग्राहकाच्या देयकाची वसुल केलेली रक्कम बँकेमध्ये जमा होत नाही. असे असतानाही ग्राहकाच्या पुढील देयकावर कोणत्याही प्रकारची थकबाकी दाखविल्या जात नाही. त्यामुळे ग्राहकांना या गैरप्रकाराची तसुभरही शंका येत नाही. ही यंत्रणा वाशिम जिल्ह्यात कार्यरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.