लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता येत्या २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपदाच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढविण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र देण्याच्या सवलतीस राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारास सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही बाब निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्यांना गैरसोयीची ठरत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यात ८ ग्रामपंचायतच्या एकूण १० सदस्य पदांसाठी ही पोटनिवडणूक आहे. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. प्राप्त अर्जांची छानणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. तसेच १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी तीन वाजतानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.