संतोष वानखडे
वाशिम : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मालेगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची (टीएचओ) सोमवार, २६ जून रोजी सुनावणी घेतली. शो-काॅज नोटीस बजावली असून, याप्रकरणी नेमकी कारवाई काय होणार? याकडे तक्रारकर्त्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.
वंचित बहुजन आघाडी युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ हे २३ जून रोजी मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गेले असता, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष बोरसे हे खुर्चीत बसून टेबलावर पाय ठेवत समोरच्यांशी बोलत होते. गरकळ यांनी या घटनेचे छायाचित्र काढून व्हाट्स ॲप स्टेट्सवर ठेवले तसेच फेसबुकवरही पोस्ट व्हायरल केली. तसेच टीएचओंनी गैरवर्तणूक केल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य विषय समितीचे सभापती चक्रधर गोटे यांनीदेखील या घटनेची दखल घेत चौकशीसाठी डाॅ. बोरसे यांना सोमवारी जिल्हा परिषदेत बोलावले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुहास कोरे यांनी याप्रकरणी मालेगाव टीएचओंची चौकशी केली. टीएचओंना शो-काॅज नोटीस बजावण्यात आल्याचे डाॅ. कोरे यांनी सांगितले.
‘त्या’ घटनेची कबुली; वरिष्ठांनी दिली समज
ग्रामीण भागातून दौरा करून कार्यालयात आल्यानंतर थकवा जाणवला. कार्यालयीन वेळेत ‘त्या’ पद्धतीने खुर्चीत बसणे चुकीचे असल्याचे मान्य करीत यापुढे असा प्रकार होणार नसल्याची ग्वाही मालेगाव टीएचओंनी दिली. याप्रकरणी वरिष्ठांनी समज दिली असून, शो-काॅज नोटीस बजावण्यात आल्याचे डीएचओंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.