मालेगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती तपासण्यासाठी संपूर्ण देशभरातील निवड शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे.
इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया या चाचणीला एनएएस (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) या नावानेही ओळखले जात असून, या चाचणीची पूर्वतयारी मालेगावच्या शिक्षण विभागातर्फे केली जात आहे. मालेगावचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे आणि बी.आर. कोहळे व नरेश नाखले यांची नेमणूक करण्यात आली आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी किती ‘लर्निंग आऊट कम’ (अध्ययन निष्पत्ती) प्राप्त केले आहे, यासाठी प्रत्येक जिल्हयातील काही निवडक शाळांतील विद्यार्थांची यात पडताळणी केली जाणार आहे. सर्व निवडक शाळांमध्ये एकाच दिवशी अर्थात १३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ही चाचणी होणार आहे. हे एकप्रकारे सर्वेक्षण असून, तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चाचणी होणार आहे. चाचणीतील प्रश्न पर्यायी पद्धतीने राहणार आहेत.
तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अॅक्टिविटी व संवाद पद्धतीद्वारे तर आठवीची चाचणी ही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचून सोडवायची आहे. तिसरी व पाचवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न राहणार असून, ९० मिनिटाची वेळ आहे. आठवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित ६० गुणांसाठी ६० प्रश्न असून वेळ दोन तासांची राहणार आहे. पर्यवेक्षकांच्या देखरेखखाली परीक्षा होणार असून, शालेय व्यवस्थापन कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे.
परीक्षा झाल्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन त्याच दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा कक्षात जमा केल्या जाणार आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीने तपासली जाणार असून, यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे.
संबंधित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक असून, आधार नसेल तर संबंधित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आधार काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सर्वेक्षण समिती शिक्षण विभागातील तज्ज्ञांचा समावेश असून, सर्वेक्षणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व वस्तुस्थिती निदर्शणात येण्याची अपेक्षा शिक्षण विभाग बाळगून आहे. या सर्वेक्षणानुसार शिक्षणाची पुढील दिशाही ठरविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव तालुक्यात यावर्षीच्या सर्वेक्षणासाठी इयत्ता तिसरी व पाचवी व आठवी करीता २६ शाळांतील २३ तुकड्यांची निवड केली आहे.