लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या मार्च २०१७ च्या निर्णयानुसार जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय हवामान तपासणी केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. जिल्ह्यातील ४६ पैकी १५ मंडळातील जागा निश्चित झाल्या आहेत. तथापि, इतर ३१ मंडळातील जागांची पाहणी झाली असली, तरी त्या जागांसंदर्भातील तांत्रिक अडचणी असल्याने त्या दूर करून, त्या निश्चित करण्याचे प्रयत्न कृषी व महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहेत. राज्यात हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाचा स्कायमेट कंपनीशी करार झाला आहे. ही कंपनी राज्यभरात हवामान केंद्र स्थापन करणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने जागा निवडण्याचे काम करण्यात येत असून, हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील १५ ठिकाणच्या जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित ३१ मंडळातील जागा निश्चित निकषानुसार काही तांत्रिक अडचणी येत आहेत. हवामान तपासणी केंद्रासाठी आवश्यक यंत्रे बसविल्यानंतर कोणतेही आक्षेप किंवा अडचण येऊ नये म्हणून जागा निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात पूर्वी एकूण आठ हवामान केंद्रे होती. मात्र, शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि आपला शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा, यासाठी राज्य शासनाने राज्यात दोन हजार हवामान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. यामुळे वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पावसाचे परिमाण मोजले जाईल. ही माहिती शेतकऱ्यांबरोबर शेअर केली जाईल, ज्यामुळे त्यांना हवामानाच्या अनुसार उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करता येईल. शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील हवामानविषयक स्थिती महावेध पोर्टल (महाराष्ट्र कृषी हवामान माहिती नेटवर्क) आणि स्कायमेटच्या मोबाइल अॅप्लिकेशनवर उपलब्ध असेल. महाराष्ट्रात सुमारे २,०६५ हवामान केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेटर पार्टनरशिप) मॉडेल येणार आहेत. यातील १ हजार केंद्र चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात जून २०१७ पर्यंत स्थापित होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे गत महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.जिल्ह्यातील निश्चित झालेल्या जागावाशिम तालुक्यात वाशिम सर्कलसह अनसिंग (कृषी उत्पन्न बाजार समिती), राजगाव (कृषी उत्पन्न बाजार समिती), तसेच वार्ला येथील ई-क्लास जमीन, रिसोड तालुक्यात मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, गोवर्धन जिल्हा परिषद शाळा, रिठद वनोजा येथील तालुका सीड फार्म, कारंजा तालुक्यात अॅग्रो पॉलीक्लिनिक कारंजा, हिवरा लाहे ग्रामपंचायत, तसेच उंबर्डा बाजार ग्रामपंचायत कार्यालय. मालेगाव तालुक्यात तालुका फु्रट फार्म, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच करंजी येथील ई-क्लास जमीन. मंगरुळपीर तालुक्यात आसेगाव ग्रामपंचायत कार्यालय आणि मानोरा तालुक्यात मानोरा तालुका सीड फार्म आदी १५ जागा स्वंयचलित हवामान केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंडळनिहाय हवामान केंद्रांसाठी जागांचा तिढा!
By admin | Published: June 16, 2017 1:51 AM