- नंदलाल पवार मंगरुळपीर (वाशिम) : कोरोना विषाणूपासून बचावासाठी, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हा एकमेव उपाय असल्याने शासनाने पुढाकार घेतला आहे. मंगरुळपीर नगर पालिकेनेही शहरातील प्रमुख चौकात ‘सॅनिटायझर’ झोन उभारले आहेत. या ठिकाणाहून येजा करणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ व निर्जंतूक करण्याचे आवाहन पालिकेचे कर्मचारी करीत आहेत. पालिकेच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.मंगरुळपीर पालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर व आरोग्य निरीक्षक राजेश संगत यांनी पोलीस व आरोग्य विभागाच्या सहकार्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने आखलेले नियोजन शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
पालिकेने भाजीपाला, किराणा व फळे विक्रीसाठी वेगवेगळे ठिकाण निवडून सुरक्षित अंतरावर दुकाने मांडण्याचे नियोजन केले आहे. या दुकानावर येणाºया नागरिकांनी अंतर राखावे, यासाठी दररोज चुन्याचा वापर करून चौकटी आखल्या जात असून, याच्या अमलबजावणीवर नियंत्रणासाठी पालिकेचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय संपूर्ण शहरात औषधांची फवारणी केली आहे. त्यात ‘लॉकडाऊन’ शिथिल असताना सकाळी ८ ते १२ दरम्यान नागरिकांचा वावर असल्याने पालिकेने शहरातील मुख्य चौकांत सॅनिटायझर झोन तयार केले आहे.
पालिकेचे कर्मचारीही तेथे तैनात असून, येथून जाणाºया नागरिकांना ‘सॅनिटायझर’चा वापर करून हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. शहरातील बिरबलनाथ मंदिर चौक, अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मानोरा चौक, बसस्टँड परिसर इत्यादी ठिकाणी हे ‘सॅनिटायझर’ झोन उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या संसर्गापासून शहरातील नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून पालिकेच्यावतीने शहरात तीन वाहनांद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊन घरात थांबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य निरीक्षक राजेश संगत यांनी केले.