नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): शहरातील पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून ठप्प आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत असून, यावर नगर पालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७९४.५३ मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के होते. त्यामुळेच तालुक्यातील जलाशय काठोकाठ भरले आणि यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे दिसू लागले; परंतु वाढलेले रब्बीचे क्षेत्र, पाण्याचा अवैध आणि वारेमा उपसा, तसेच रखरखत्या उन्हामुळे वेगाने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील १५ पैकी निम्मे जलाशय कोरडे पडले. तथापि, मंगरुळपीर शहरासह इतर काही खेडेगावांना पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पात अद्यापही ४० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासियांसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खेडेगावांत पुरेसा पाणी पुरवठाही करण्यात येत आहे. त्यात गेल्या आठवड्यात या प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जोडलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. शहरातील काही हातपंप बंद पडले असताना नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. नगर पालिका प्रशासनाने यावर तातडीचे उपाय करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) लाखो लीटर पाण्याचा अपव्ययमंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाची जलवाहिनी दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांतच फुटण्याचे प्रकार घडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. यंदाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे फुटलेल्या जलवाहिनीतून दरदिवशी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराची तपासणीच नगर पालिका प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जलवाहिनी फुटली: मंगरुळपीरचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 3:37 PM