छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळावी. या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अन्य तालुक्यांप्रमाणेच मानोरा तालुक्यातही एमआयडीसीकरिता ठरावीक जागा राखून ठेवलेली आहे. त्यावर ३५ भूखंड पाडण्यात आले असून १५ भूखंड उद्योग करू इच्छितांच्या ताब्यात देण्यात आले. असे असले तरी एमआयडीसी परिसरात आजपर्यंत उद्योगांना आवश्यक ठरू पाहणाऱ्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी रस्ते तयार करण्यात आले; मात्र पाणी, वीज, आवारभिंत यासह अन्य महत्वाच्या सुविधांची अद्याप उणीव भासत आहे. यामुळेच सुस्थितीत सुरू असलेला जिनिंग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला असून सध्या केवळ अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव कारखाना एमआयडीसीत सुरू आहे.
....................
मानोरा एमआयडीसी
५ एकर
जमीन अधिग्रहित
१९९८
वर्ष
१५
उद्योजकांना भूखंड वाटप
...................
घोडे कुठे अडले?
मानोरा येथील एमआयडीसीत केवळ रस्ते सोडल्यास वीज, पाणी यासह इतर स्वरूपातील मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
काही वर्षांपूर्वी एमआयडीसी परिसरात कापूस प्रक्रिया करणारा जिनिंग कारखाना सुरू झाला होता; मात्र तो कालांतराने बंद पडला. तेव्हापासून पुन्हा सुरू झाला नाही.
सध्या संपूर्ण एमआयडीसीत केवळ एक अगरबत्ती तयार करण्याचा कारखाना सुरू आहे; मात्र पुरेशा प्रमाणात सुविधा नसल्याने तोदेखील बंद पडल्यास आश्चर्य वाटू नये, अशी एकूण स्थिती आहे.
.................
उद्योजक यायला तयार नाही
मानोरा तालुका कायम दुर्लक्षित असलेला भाग आहे. क्षेत्रफळाच्या तुलनेत लहान स्वरूपातील या तालुक्यात उद्योगधंदे सुरू झाल्यास प्रगती होणे शक्य आहे; मात्र एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यास कुठलाच उद्योजक तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप कायम आहे.
...............
उद्योग सुरू होतील, रोजगार मिळेल हे स्वप्न राहिले अधुरे!
मानोरा शहरात २३ वर्षांपूर्वी जेव्हा एमआयडीसीकरिता जमीन अधिग्रहीत करण्यात आली, तेव्हा याठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे सुरू होतील आणि रोजगाराचा प्रश्न मिटेल, अशी अपेक्षा होती; मात्र पुढे काहीच झाले नाही.
- विकास कांबळे
..............
उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळावी, अशी अपेक्षा लागून असते; मात्र मानोरा येथील एमआयडीसीमध्ये कुठलाही मोठा उद्योग अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न कायमच आहे.
- परमेश्वर चव्हाण
..............
उद्योगधंदे सुरूच करायचे नव्हते; तर शेतजमीन कशासाठी अधिग्रहीत केली. एमआयडीसीत उद्योगधंदे आणण्याकरिता आजवरच्या एकाही लोकप्रतिनिधीने सक्रिय पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगार वाढली आहे.
- अनिल शिंदे