लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार असल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. घोडेबाजार तेजीत असून, नगर पंचयतवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्ष व नेते सरसावले असल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.मानोरा पगर पंचायतची सदस्य संख्या १७ एवढी आहे. त्यापैकी भारिप बहूजन महासंघ व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाचे ७ सदस्य, काँग्रेस ४, शिवसेना व भाजपा प्रत्येकी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विद्यमान नगराध्यक्ष रेखा पाचडे या भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाच्या आहेत. त्यांची निवड अविरोध झाली होती. आगामी नगराध्यक्ष पद अनुसुचित जातीकरिता आरक्षित आहे. भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाकडे मंजुुषा महेश निशाने, काँग्रेसकडे बरखा बेग आणि भाजपाकडे ज्ञानेश्वर गोतरकर हे तीन उमेदवार दावेदार आहेत. सध्या केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असून मानोरा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. भारिप बमसंची सत्ता नगर पंचायतमध्ये आहे. आपलीच सत्ता कायम राहावी यासाठी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी ताकदीने प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे कांँग्रेसकडे सुद्धा नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार असल्याने तेदेखील प्रयत्न करताना दिसत आहेत. हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाचे सर्वेसर्वा हेमेंद्र ठाकरे यांनी अद्याप पत्ते खुले केले नसले तरी काँग्रेससोबत जातील, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन सभापती पद देऊन हेमेंद्र ठाकरे यांच्यावर विश्वास दाखविला होता. त्याची परतफेड म्हणून हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाचे नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करून ‘किंग मेकर’च्या भूमिकेत राहू शकतील, अशी चर्चा आहे.
श्रेय लाटण्याच्या वृत्तीमुळे शहराचा विकास खुंटलाअंतर्गत गटबाजी आणि श्रेय लाटण्याच्या प्रयत्नाने मानोरा शहराच्या विकास प्रक्रियेत गतिरोध निर्माण केला. पक्षीय मतभेद बाजूला सारून दहा नगरसेवकांचा एक गट तयार झाला असून, कोणताही ठराव घेत असताना हा गट सोबत असतो, असे दिसून येते. आता आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षीय बंधने झुगारून या १० नगरसेवकांचा गट एकत्र राहतो की पक्षादेश पाळून पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले जाते, याकडे शहरवासियांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वच राजकीय पक्ष व नेते कामाला लागले आहेत. यासाठी बैठका सुरू असून, पावसाळ्यातही राजकीय वातावरण तापले आहे.
घोडेबाजार तेजीत दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनिमित्ताने घोडेबाजार तेजीत असल्याची चर्चा आहे. सत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टिकोनातून काही सदस्यांची जुळवाजूळव करण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. घोडेबाजार तेजीत असल्याने पक्षादेश बाजूला सारला जातो की पक्षाशी एकनिष्ठ राहून मतदान करण्याला प्राधान्य दिले जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.