वाशिम, दि. ३- मानोरा शहर विकासासाठी शासनाकडून ११ कोटींचा भरघोस निधी प्राप्त असूनही, केवळ जिल्हाधिकार्यांची मंजुरी मिळत नसल्याने विकासात्मक कामे ठप्प असल्याचा आरोप नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी निवेदनाद्वारे केला.नवनिर्मित नगर पंचायतींचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी पुरविला जात आहे. विविध योजनेंतर्गत मानोरा नगर पंचायतला कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. या निधीतून शहराचा विकास साधला जाईल, अशी अपेक्षा मानोरावासीयांना होती. मात्र, अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने आणि ३१ मार्च डोळ्यासमोर असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून तीन कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेतून दोन कोटी, नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय योजनेंतर्गत सहा कोटी, रस्ता अनुदान निधीमधून २0 लाख असा एकंदरित ११ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मानोरा नगर पंचायतला मिळाला आहे. या निधीतून कामे सुरू होण्यासाठी जिल्हाधिकार्यांची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने शहर विकासापासून कोसो दूर असल्याचे नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी निवेदनात नमूद केले. शहर विकास कामांचे नियोजन करण्याचे उद्देशाने नगर पंचायतचे ठराव मंजूर आहेत, असे असतानाही केवळ राजकीय कुरघोडी म्हणून मानोरा शहराचा विकास रोखला जात आहे, असा घणाघाती आरोपही पाचडे यांनी केला. शासन निर्णयानुसार, नगर पंचायत व नगर परिषदेला योजनेंतर्गत वितरण करण्यात आलेल्या निधिकरिता स्वतंत्र बँक खाते असावे, या बँक खात्यात निधी ठेवण्यात यावा, असे नियम सांगतो. मात्र, अद्यापही मानोरा नगर पंचायतच्या स्वतंत्र बँक खात्यात कोट्यवधींचा हा निधी का ठेवण्यात आला नाही, या निधीचे व्याज कुणाच्या फायद्याचे? असा प्रश्नही नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी उपस्थित केला. बँक खात्यात निधी नसल्याने तांत्रिक मंजुरीसाठी एक टक्का याप्रमाणे ११ लाख रुपये नगर पंचायत कोठून भरणार? असा सवालही पाचडे यांनी उपस्थित केला. राजकीय दबावातून मंजुरी मिळत नसेल, तर न्यायोचित मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही नगराध्यक्ष पाचडे यांनी दिला आहे.
मानोरा नगर पंचायतचा ११ कोटींचा निधी धूळ खात!
By admin | Published: March 04, 2017 1:52 AM