जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना कक्षाद्वारा पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायतींमार्फत विविध कामांना मान्यता मिळवून घेण्याची सूचना पत्रांव्दारे व यापुर्वी वेळोवेळी झालेल्या सभांमधून देण्यात आली. असे असताना मानोरा पंचायत समिती स्तरावर अद्यापपर्यंत एकही काम मंजूर नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मानोरा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने मजूरांना स्थानिक पातळीवर काम मिळणे अशक्य झाले. अशा स्थितीत तालुक्यातील जाॅबकार्डधारक पात्र मजूरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळू शकले नाही. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मग्रारोहयो कक्षाकडून पंचायत समितीला पाठविण्यात आलेल्या पत्रात पं.स. स्तरावरील जबाबदार कर्मचाऱ्यांनी जाणून-बुजून कामांकडे दुर्लक्ष केल्याबाबत ताशेरे ओढण्यात आले. तसेच मग्रारोहयोअंतर्गत कुठल्याच कामास मंजुरी न दिल्याप्रकरणी येत्या दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत व समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
‘मग्रारोहयो’च्या कामांना मानोरा पंचायत समितीकडून ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:37 AM