वाशिम : कारंजा आणि वाशिम येथे चालविल्या जाणार्या भाड्याच्या इमारतींमधील शासकीय वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबाबतचे प्रकरण ह्यलोकमतह्णने उचलून धरले. त्याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने सामाजिक न्याय विभाग चांगलाच हादरला असून, दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याची हालचाल सध्या जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत वाशिम शहरात अनंत व्यंकटराव मुसळे यांच्या मालकीच्या इमारतीत वसतिगृह चालविले जाते. दरमहा २७ हजार ३५0 रुपये भाडे असलेली ही इमारत मात्र ७६ विद्यार्थ्यांच्या तुलनेत अगदीच अपुरी पडत असून, इतर सुविधांनाही याठिकाणी सपशेल कोलदांडा देण्यात आला. पलंग, गाद्यांची दुरवस्था होण्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून इमारतींमधील खोल्यांची रंगरंगोटी झालेली नाही. परिणामी, वसतिगृहात वास्तव्य करणार्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील कारंजा येथे दरमहा १७ हजार रुपये भाडे असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीतही विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. यासंदर्भात लोकमतने २३ जूनच्या अंकात स्टिंग ऑपरेशन प्रकाशित करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्याची सामाजिक न्याय विभागाचे अमरावती येथील उपसंचालक आणि वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तडकाफडकी दखल घेऊन याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याचा निर्णय झाला असून, यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने २७ जून रोजी वाशिम आणि कारंजा येथे वसतिगृहांकरिता सर्व सुविधांयुक्त इमारती भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत सूचना काढली आहे. केवळ 'लोकमत'च्या सलगच्या पाठपुराव्यामुळे वसतिगृहाच्या इमारती बदलण्याचा हा प्रश्न मार्गी लागल्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वसतिगृहाच्या इमारती बदलण्याची हालचाल
By admin | Published: June 28, 2016 2:42 AM