रुग्णालयात गेल्यास कोरोनाचाचणीचा सल्ला दिला जातो, आपल्याला क्वारंटाईन राहावे लागेल किंवा कोविड केंद्रात भरती व्हावे लागेल, इंजेक्शन व बेड मिळणार नाही या संभाव्य भीतीपोटी अनेकजण सर्दी, ताप आला तरी घरगुती उपाय किंवा मेडिकलवरून एखादी गोळी घेऊन अंगावर दुखणे काढत असल्याचे मालेगावात दिसून येत आहे. तर काही रुग्ण घरगुती उपचाराचा आधार घेत दिवस काढत आहे. असे रुग्ण व त्यांच्या सतत संपर्कात असलेले त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य खुलेआम सामान्य जनतेत सरमिसळ होत असल्याने कोरोना प्रसाराचे प्रमुख कारण ठरत आहे.
विविध उपाययोजना करूनही कोरोनाचा प्रसार व मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. मास्क लावा , फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, स्वच्छता पाळा, कोणालाही ताप, खोकला याचा त्रास सुरू झाल्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र , विनाकारण फिरणे , मास्क न लावणे ही बाब शहरासह खेड्यात पाहायला मिळते. अनेक गावांत , अनेक कुटुंबांत ताप येणे, डोकेदुखी , सर्दी - खोकला असलेले रुग्ण पहायला मिळत आहेत. हे सर्व रुग्ण
दवाखान्यात जाऊन उपचार करण्याऐवजी दवाखान्यात गेल्यास कोरोनाबाधित ठरू, या भीतीने घरीच घरगुती उपचाराचा आधार घेत आहेत. कोरोनाने आता सर्वच वयोगटांतील व्यक्तींना संसर्ग होत आहे . कोरोनाच्या प्रसारामुळे यंत्रणेवर ताण वाढला आहे .
इनबॉक्स
आपल्या कुटुंबांत ताप येणे, डोकेदुखी, सर्दी - खोकला असलेले रुग्ण, चव न येणे असे रुग्ण असतील तर ताबडतोब दवाखण्यात जावे. कोरोना चाचणी करावी आणि योग्य ते उपचार करावे. कुणीही अंगावर दुखणे काढू नये.
डॉ. संतोष बोरसे
तालुका आरोग्य अधिकारी मालेगांव