००००
रस्त्याच्या बाजूला शेणखताचे ढिगारे
वाशिम : तालुक्याच्या ग्रामीण भागांत अनेक गावांमध्ये शेणखताचे ढिगारे आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले हे ढिगारे गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण रस्त्याच्या शेजारीच ढिगारे लावत आहे.
०००
सुविधा नसतानाही प्लॉटची विक्री
वाशिम : प्लॉट विक्रीच्या व्यवसायात यावर्षी प्रचंड मंदी आहे. कृषी उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेचा प्रतिसाद फारसा मिळत नाही. अशा स्थितीतही सुविधा नसतानाही नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे फंडे दाखवून प्लॉट विक्री सुरू असल्याचे दिसून येते.
०००००
जऊळका येथे आणखी एक रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आणखी एका जणाला कोरोना संसर्ग झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले. या रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले असून, आरोग्य विभागातर्फे गावात सर्वेक्षण केले जात आहे.
००
कलावंतांच्या समस्या सोडविण्याची मागणी
वाशिम : गेल्या १०महिन्यांपासून प्रलंबित मानधनासह वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी लोककलावंत संघटनेने विविध टप्प्यांत आंदोलन केले. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने कलावंतांना कमीत कमी पाच हजार रुपये दरमहा मानधन सुरू करावे, अशी मागणी कलावंत संघटनेने शुक्रवारी केली.
000
ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त
वाशिम : किन्हीराजा जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास नऊ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही.
०००००
लक्षणे असल्यास चाचणी करावी
वाशिम : वाशिम शहर व तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. सर्दी, ताप व खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी रविवारी केले.
०००००००
पाणवठ्याअभावी वन्यप्राणी गावाकडे
वाशिम : मालेगाव, मानोरा, कारंजा तालुक्यात घनदाट असे जंगल आहे. वन्यप्राण्यांमुळे या जंगलांना जिवंत स्वरूप आले आहे. आता या जंगलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी हे पाण्यासाठी गावाकडे फिरकत आहेत.
००००
घरकुल योजनेची कामे रखडली
वशिम : जिल्ह्यात विविध घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली. मात्र, रेतीअभावी अनेकांची बांधकामे रखडली आहे. काहींना निधी न मिळाल्यामुळे कामे थांबून आहे. त्यामुळे लाभार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.
०००००००
उंबर्डा बाजार येथे नागरिकांची तपासणी
वाशिम : उंबर्डा बाजार येथील आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ एप्रिलला पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी तसेच गावात सर्वेक्षण सुरू केले.
०००००