मानोरा-तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेले असून, नद्यावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहे.
संततधार पाऊस मागील काही दिवसांपासून पडत असल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या पूस नदीने रौद्र रूप धारण केलेले आहे, ज्याचा फटका तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ, मेंद्रा, ईंगलवाडी, रुई, गोस्ता या गावांना बसलेला आहे. पूस नदीच्या प्रलयंकारी प्रवाहाने वरील गावातील असंख्य शेतकऱ्यांची शेकडो एकर शेतीलाही नुकसानीचा सामना करावा लागलेला आहे. इंगलवाडी आणि रुई येथील पूस नदीवरील पूल पुराखाली गेल्याने पुसद कडे जाणारा मार्ग अरुंद झालेला आहे.
अरुणावती या दुसऱ्या मोठ्या नदीला मोठे पूर आल्याने नदीकाठच्या साखरडोह,रोहना, कोंडोली, आसोला, मानोरा, कारखेडा,वरोली येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
कोंडोली येथील नदीवरील पूल मागील महिन्यात वाहून गेल्याने कोंडोली पलीकडील गावांचा संपर्क तुटलेला आहे.
तालुक्यात मुसळधार पावसाने आलेल्या पुरामध्ये मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिक व शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.