यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड हे सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करण्यात आलं असून ते यवतमाळ जिल्ह्याचेही पालकमंत्रीही आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, जनतेची सहानुभूती काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळत आहे. त्यामुळे, शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते. कारण, आमदार संजय राठोड यांनी वाशिममधील जनतेला विनंती केली आहे. माझ्यामागे अनेकजण हात धुवून लागले आहेत, तुम्ही मला मदत करा, अशी आर्जवच त्यांनी लोकांपुढे केली.
वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मी यवतमाळमध्ये गेल्या 25 वर्षांपासून रुग्णांसाठी मदतीचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला मदत करा, तुम्ही जरी मला मतदान करत नाहीत, पण तुमचे नातेवाईक हे माझ्या मतदारसंघात राहतात, त्यांना तुम्ही फोन करून नेहमी सांगता. यंदाही मला निवडून आणण्यासाठी अशीच मदत राहुद्या, अशी विनंतीच यवतमाळमधील जनतेला संजय राठोड यांनी केली आहे. विशेष म्हणजे, अनेकजण माझ्यामागे हात धुवून लागले आहेत, असेही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महंत यांनी एकप्रकारे मंत्री संजय राठोड यांना आव्हानच दिले आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचंही त्यांना यंदा आव्हान असणार आहे. त्यामुळे, मंत्री राठोड यांनी केलेली आर्जव लोकं ऐकतील का हे पाहण्यासाठी आणखी मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे.
तातडीने चौकशीचे दिले आदेश
दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवल्याचं निदर्शनास आले आहे. या दुर्घटनेची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राठोड यांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून यवतमाळच्या प्रवाशांबाबत माहितीही घेतली होती.