वाशीम : तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. यावेळी त्याच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरुन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेवून बलिदान दिले. या घटनेमुळे राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने सुरू झाली. तर आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतानाही मराठा समाजातील आंदोलक दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात दरदिवशी सुरू असलेले आंदोलने किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा विविध प्रसार माध्यमांनीही लावून धरला आहे.
सोमवारी मोहगव्हाण येथील डुबे कुटुंब शेतात गेले होते. घरी एकटाच असलेला पवन दुरचित्रवाणीवर आरक्षणाविषयीच्या बातम्या पाहून आवेशात आला. यातूनच त्याने सायंकाळी 5.30 च्या सुमारास घरात असलेले किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तो मराठ्यांच्या आरक्षणावरुन चिंतेत राहत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तर त्याच्या खिशात आरक्षणासाठीची चिठ्ठीही आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.