वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. गुरुवारी (2 ऑगस्ट) मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड फाटा येथे आंदोलकांनी रास्ता रोको व मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ठोस हालचाली दिसत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. किन्ही घोडमोड फाटयावर गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील वाहतुक बराच वेळ ठप्प झाली होती.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी स्विकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात किन्ही घोडमोड, मिर्झापूर, घाटा, दुधाळा, वसारीसह परिसरातील सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलीस उपनिरिक्षक सुरेश नाईकनवरे यांना सकल मराठा समाज बांधवांनी निवेदन दिले.