वाशिम : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या शिफारशीनुसार क्रिमिलेअरमधून कुणबी समाजाला न वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवत सदर घोषणेस विस्तृत प्रसिध्दी देण्यात यावी म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने राज्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सहसचिव भा.रा. गावित यांना वाशिम जिल्हाधिकाºयांमार्फत २४ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले.
मराठा सेवा संघाचे वतीने नोंदवण्यात आलेल्या आक्षेपाच्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने २८ आॅक्टोबर २०१४ रोजी शासनास सादर केलेल्या शिफारशी अहवालात क्रमांक ४९ नुसार ओबीसीमधील कुणबी प्रवर्गाला क्रिमीलेअरमधून वगळण्याबाबत शिफारस केली नाही. तसेच याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी व्यापक प्रमाणात शासनाचे वतीने प्रसिद्धी देण्यात आली नाही. त्यामुळे मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्यावतीने या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठी सदर विभागाचे सहसचिव गावित यांना वाशिम जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भरत आव्हाळे, सरचिटणीस नारायणराव काळबांडे, कोषाध्यक्ष प्रा. योगेश्वर निकस, माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव अवचार, विभागीय सचिव प्रा. अनंतराव गायकवाड, दत्तात्रय कावरखे, ए.जी. वानखेडे, नागेश कव्हर, के.टी. केळे, अॅड. दादाराव आदमने, राजेश शिंदे, पी.आर. शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.