.............
सेवा भवन उभारण्यासाठी निवेदन
रिसाेड : मोहजा बंदी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सेवा भवन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून विविध संस्कृतिक, धार्मिक उत्सव व लग्न सोहळा यासाठी ग्रामस्थांना सुविधा होईल, अशी मागणी मोहजा बंदी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी २१ जानेवारीला वनमंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
.............
जिल्ह्यात करडई क्षेत्रात वाढ !
वाशिम : बाजारपेठेचा अभाव आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे करडईच्या पेरणीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ केली होती. तथापि, गेल्या काही वर्षांत या तेलवाणाला मागणी होत असल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा या पिकाकडे कल वाढला आहे. यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ८० टक्के क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.
.............
नुकसान भरपाई देण्याची मागणी
अनसिंग : परतीच्या पावसामुळे हजारो एकरावरील सोयाबीन, कपाशी आदी पिके पाण्याखाली गेली होती. या आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले. त्यापूर्वीही मूग व उडदाचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीची नोंद नसल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
...........
रिसोड-वाशिम रस्ता काम संथ गतीने
रिठद : रिसोड-वाशिम या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांची गैरसोय हाेत आहे. एका बाजूने रस्ता खोदकाम करण्यात आले असून, काही ठिकाणी पर्यायी रस्ताही उखडला आहे. यामुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसून येतात.
.............
खंडित वीजपुरवठ्याने गावकरी त्रस्त
कारंजा : येथून जवळच असलेल्या ग्राम धोत्रा देशमुख येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील गावकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या धनज बु. येथील कनिष्ठ अभियंत्यांना निवेदनही दिले. परंतु याचा फायदा झाला नसून परिस्थिती जैसे थेच आहे.
............
नियमांचे उल्लंघन; चालकांवर कारवाई
ताेंडगाव : ताेंडगाव फाट्यानजीक २२ जानेवारी राेजी जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.