लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील भोन येथील स्तूप तसेच देशातील अन्य स्तूपांचे (बुद्ध विहार) जतन करण्याच्या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे १५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले होते. वाशिम जिल्ह्यातही मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यात आले.पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात भोन येथे एक बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले आहेत. या बौद्ध स्तुपाचे संवर्धन करण्यासह या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, स्तूप सुरक्षित ठेवावा, देशातील पवनी स्तूप, अडम स्तूप, सोपारा स्तूप, कोल्हापूरचा मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे जतन करणे, देहू रोड बुद्धविहाराचे जतन करावे या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने १५ सप्टेंबर रोजी वाशिम शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दुपारी १ वाजतादरम्यान मोर्चाला सुरूवात झाली. पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशा मोर्चा निघाला. मोर्चात शेकडो समाजबांधव, महिला, पुरूषांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केले. देशातील स्तूपाचे संवर्धन करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतीकडे पाठविण्यात आले.
स्तूपांचे संवर्धन करण्यासाठी वाशिम येथे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 4:21 PM