वाढती महागाई आणि साठेबाजीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर २०२१पर्यंत लागू राहणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून, तो तत्काळ प्रभावाने लागूही करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारीवर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थच सोमवार, दि. ५ जुलैपासून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे खरीप हंगामात विविध अडचणी सोडविण्यासाठी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत व्यापाऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे सोमवार १२ जुलैपासून व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी सुरू केली आहे.
-------------
स्टॉक लिमिटच्या आदेशाला विरोध कायम
केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्यांच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर-२०२१ पर्यंत लागू राहणार आहे. शेतमाल स्टॉक लिमिटच्या या आदेशाला व्यापाऱ्यांचा विरोध कायमच असून, यावर शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. शासनाने पुनर्विचार न केल्यास शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
----------
कोट: शासनाच्या स्टॉक लिमिट निर्णयाच्या विरोधात बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या; परंतु शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने सोमवारपासून शेतमाल खरेदी सुरू करण्यात आली आहे. खासगी बाजारही सुरू करण्यात आले आहेत.
-आनंद चरखा,
अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम