वाशिम : होळी, धुलिवंदन सणानिमित्त वाशिमसह जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील बाजारपेठेत चैतन्य असून, विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविण्यात आला.होळी, धुलिवंदन सणाला विशेष महत्व आहे. होळीच्या दिवशी पूजेला फार महत्व असून, होळीला साखरगाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या गाठीची मागणी मागील तीन दिवसांपासून वाढलेली आहे. या साखरगाठ्यांच्या विक्रीतून जिल्हाभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. होळी व धुलिवंदन सणाच्या निमित्ताने स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्याने दुकाने सजलेली आहेत. शनिवारी सायंकाळपासून वस्तू व साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. सुटीचा दिवस असल्याने रविवारी (दि.२४) सकाळपासूनच विविध प्रकारचे रंग, पिचकारी व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी वाशिमसह रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व मानोरा शहरातील बाजारपेठेतही नागरिकांनी गर्दी केली. पिचकारी, विविध प्रकारचे रंग, मुखवटे, बलून्स् खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनीची एकच धूम बघावयास मिळाली. यानिमित्ताने बाजारपेठेतही चैतन्य पसरले असून, रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदी-विक्रीतून जवळपास ७० ते ८० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.
१० टक्क्याने वाढल्या किमतीयंदा पिचकारी, मुखवटे, विविध प्रकारचे रंग आदींच्या किमतीत जवळपास ७ ते १० टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून आले. साध्या प्रकारातील पिचकारी ५० ते १५० रुपये, मध्यम स्वरुपातील १५० ते ६०० रुपये व उच्च प्रतिची पिचकारी ६०० ते २००० रुपये अशा किंमती होत्या.