वाशिम : खुले मैदान, हाॅल, लाॅन यांना जागेच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार लग्न समारंभाकरिता परवानगी देण्यात यावी, या मागणीकरिता विवाह सेवा संघर्ष समिती, जिल्हा टेन्ट ॲन्ड डेकाेरेटर असाेशिएशनच्या सदस्यांनी जिल्हािधकाकारी कार्यालयात ४ मार्च राेजी धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रशासनामार्फत काेराेनामुळे लग्न समारंभास जी परवानगी २५ लाेकांची देण्यात आली आहे ती परवानगी खुले मैदान, हाॅल, लाॅन यांच्या जागेच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार देण्यात आल्यास व्यावसायिकांचे हाेणारे नुकसान कमी हाेईल. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचा पूर्ण वर्षाच्या खर्चाचे बजेट या लग्न समारंभाच्या तीन महिन्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. गतवर्षी काेराेनामुळे मार्च महिन्यापासून शंभर टक्के लाॅकडाऊन असल्यामुळे आमचा पूर्ण व्यवसाय बंद हाेता. त्यामुळे आम्ही व्यावसायिक फार खचून गेलेलाे आहाेत. याहीवेळी अशीच परिस्थिती राहिली तर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण हाेईल. तसेच या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरणे सुध्दा कठीण हाेणार आहे. तरी या बाबीचा विचार करुन न्याय देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदाेलन छेडण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर विवाह सेवा संघर्ष समिती, जिल्हा टेन्ट ॲन्ड डेकाेरेटर असाेशिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.