जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ठाण मांडून आहे. गतवर्षी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेकजण धावून आले. कुठे लोकवर्गणीतून, तर कुठे स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्यकर्त्यांनी गरजूंची भूक भागविण्याकरिता दातृत्त्वाचा हात पुढे केला. मात्र, कालांतराने सामाजिक कार्याचा हा झरा बहुतांश आटत गेला. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक वगळले तर कोणीही मदतीसाठी हात पुढे करायला तयार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कुठलाही गाजावाजा न करता ‘माऊली’ या एकाच नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नाष्टा आणि जेवण घेऊन एक वाहन रोज सकाळी न चुकता उभे राहात आहे. ‘माऊली’च्या कार्यकर्त्यांकडून पाण्याचीही व्यवस्था केलेली असते. नाष्टा आणि जेवण घेण्यासाठी रांगेत उभे राहून तथा शिस्तीत रुग्णांचे नातेवाईक या सेवेचा लाभ घेतात आणि मनोमन समाधान व्यक्त करून ‘माऊली’च्या कार्यकर्त्यांना भरभरून आशीर्वादही देतात. हे प्रेरणादायी चित्र पाहून रुग्णालयातील डाॅक्टर, आरोग्यसेवक आणि परिचारिकाही भारावून गेल्या आहेत.