लोकमत न्यूज नेटवर्करिसोड/मालेगाव : गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी अनेक गावांत यावर्षीदेखील पाणीटंचाई उद्भवलेली असताना, ‘मे’ महिना संपल्यानंतरही प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी पायपिट होत आहे. दुसरीकडे रिसोड तालुक्यातील काही गावांत जलसंधारण व गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे काही गावांतील पाणीटंचाईची तिव्रता कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.गतवर्षी रिसोड तालुक्यात करंजी गरड, लेहणी, केनवड, कुऱ्हा, वाकद, गौंढाळा, नंधाना, गणेशपूर, पिंप्री सरहद्द आदी नऊ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर २३ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले होते. यावर्षी केवळ करंजी गरड येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षीच्या टँकरग्रस्त असलेल्या कुऱ्हा, लेहणी, नंधाना येथे भीषण पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी ग्रामपंचायतने तहसीलकडे प्रस्ताव सादर केले आहेत. अद्याप मंजुरात मिळाली नसल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर पिंप्री सरहद्द येथे गतवर्षीच्या पावसामुळे जलपातळीत वाढ झाल्याने फारशी पाणीटंचाई जाणवत नाही तसेच वाकद दोन शेतकऱ्यांचे बोअर अधिग्रहित करण्यात आल्याने टँकरची गरज भासली नाही. गतवर्षी मालेगाव तालुक्यातील एकांबा, पांगरी नवघरे, मुठ्ठा, दापुरी कालवे, देवठाणा खांब, गांगलवाडी, पांगरी कुटे, खेडी, वरदरी बु., काळाकामठा, कुराळा, पिंपळवाडी, तिवळी, भिलदुर्ग, वाकळवाडी, वाकद, पांगरखेडा, खडकी इजारा, खैरखेडा, रेगाव, राजूरा आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर ८१ कोटी ६४ लाख रुपये खर्च झाले होते. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी यावर्षी केवळ पांगरी कुटे, वरदरी, देवठाणा खांब, वाकळवाडी येथे टँकर सुरू झाले. आठ दिवसांपूर्वी राजुरा येथे टँकर सुरू झाले. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांपैकी खैरखेडा येथे सध्या भीषण पाणीटंचाई आहे. दूषित पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. ‘मे’ महिना सरल्यानंतरही खैरखेडा येथे टँकर सुरू झाले नाही. कुराळा, पिंपळवाडी, गांगलवाडी येथील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यावर्षीदेखील पाणीटंचाई असताना ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पिंप्री सरहद या गावात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई होती. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे फारशी पाणीटंचाई नाही. - व्ही.आर.दांडगे, ग्रामविकास अधिकारी, पिंप्री सरहद्दगतवर्षी वाकद येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी गावातील सर्वाधिक पाणी असणारे दोन बोअर अधिग्रहित केले आहेत. त्यामुळे गावात फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे यावर्षी टँकरचा प्रस्ताव सादर केला नाही.- रत्नप्रभा जामधाडे, सरपंच , ग्राम वाकद ता.रिसोड
‘मे’ संपला; तरीही टँकर नाही!
By admin | Published: June 01, 2017 1:11 AM