वाशिम : कोरोनाकाळात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला. जिल्ह्यासाठी बॉन्डवाले २५ एमबीबीएस डॉक्टर मिळाले असून, यापैकी १७ डॉक्टर ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर आठ डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात रूजूही झाले.
कोरोनाची पहिली लाट साधारणत: मार्च ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान होती. या काळात रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर उभारण्यात आले, तसेच काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांची करार स्वरुपात सेवाही घेण्यात आली. पहिली लाट ओसरल्यानंतर कोविड केअर सेंटर बंद केले, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात आली. फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोविड केअर सेंटरचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले, तसेच ११ महिन्यांसाठी कंत्राटी स्वरुपात १३ एमबीबीएस डॉक्टरांची सेवा घेण्यात आली. यापैकी ८ डॉक्टर शहरी भागातील सरकारी रुग्णालयांत, तर पाच डॉक्टर ग्रामीण भागात रूजू झाले होते. या डॉक्टरांची आरोग्य सेवा सुरू असतानाच, वरिष्ठ स्तरावरून बॉन्ड स्वरुपात असलेल्या २५ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती वाशिम जिल्ह्यासाठी करण्यात आली. त्यामुळे कंत्राटी स्वरुपात असलेल्या १३ एमबीबीएस डॉक्टरांचा करार संपुष्टात आला. बॉन्डवाले २५ एमबीबीएस डॉक्टरांपैकी १७ जण ग्रामीण भागात, तर ८ जण शहरी भागातील सरकारी रुग्णालयांत रूजू झाले. नियुक्तीपत्र मिळालेल्या एकाही डॉक्टरने ग्रामीण भागात रूजू होण्यास नकार दिलेला नाही, हे विशेष. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही एमबीबीएस डॉक्टर रुजू होत असल्याने आरोग्य सेवा आणखी बळकट होईल, असा आशावाद ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त होत आहे.
०००००००००००००००००००००००००
कोरोनाकाळातील एकूण नियुक्त्या १३
शहरी भागातील नियुक्त्या ८
हजर झाले किती ८
ग्रामीण भागातील नियुक्त्या ५
हजर झाले किती ५
०००००००
एमबीबीएस डॉक्टरची एक जागा रिक्त
जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आता नव्याने १७ एमबीबीएस डॉक्टर मिळाले आहेत. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटले आहे. आता एमबीबीएस डॉक्टरांचे केवळ एक पद रिक्त आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची मात्र ७० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. शासनाने पदभरतीला मान्यता दिल्याने आता आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही भरली जातील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
००००००००००००००००००
कोट बॉक्स
कोरोनाकाळात कंत्राटी स्वरुपात १३ एमबीबीएस डॉक्टरांना ११ महिन्यांच्या मुदतीसाठी नियु्क्तीपत्र दिले होते. अलीकडच्या काळात बॉन्डवाले २५ एमबीबीएस डॉक्टर शासनस्तरावरून वाशिम जिल्ह्यासाठी मिळाले आहेत. यापैकी १७ डॉक्टरांना ग्रामीण भागात नियुक्तीपत्र दिले असून, सर्वजण रुजूही झाले आहेत. बॉन्डवाले एमबीबीएस डॉक्टर मिळाल्याने कंत्राटी स्वरुपातील १३ डॉक्टरांचा करार संपुष्टात आला आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.
०००००००
सर्व डॉक्टर रूजू !
कोरोनाकाळात कंत्राटी स्वरुपात घेतलेले १३ एबीबीएस डॉक्टर कर्तव्यावर रूजू झाले होते. आता बॉन्डवाले २५ एमबीबीएस डॉक्टर मिळाले असून, सर्व डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाले आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात फारशा सुविधा उपलब्ध नसतात. असे असले तरी, नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर एमबीबीएस डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रांत रूजू झाल्याने आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.