लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २० आठवड्या पलिकडील गर्भाचा वैद्यकीयगर्भपात करण्यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय घेण्यासाठी विद्यमान न्यायालयांनावैद्यकीय मंडळाचा सल्ला घ्यावा लागतो. गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय सल्ला तातडीने मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्हास्तरावर स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्यानुसार, वाशिम येथे १० जणांचा समावेश असलेले स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाणार आहे.वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ नुसार राज्यात २० आठवड्या पलिकडील गर्भाचा वैद्यकीय गर्भपात करण्याकरीता जिल्हा, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत असतात. या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी विद्यमान न्यायालयांना वैद्यकीय मंडळाचा सल्ला घ्यावा लागतो. गर्भपात करण्यासाठी तातडीने सल्ला मिळावा याकरीता प्रत्येक जिल्ह्यात सल्ला देण्यासाठी स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केल्या होत्या. त्या अनुषंगाने ३१ जिल्हा स्तरावर स्थायी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. ३१ पैकी १२ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असून या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे स्थायी वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष राहतील. वाशिम जिल्ह्यासह १९ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नसल्याने या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक हे स्थायी वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष राहणार आहेत. याव्यतिरिक्त या मंडळात स्त्री रोग व प्रसुती शास्त्रज्ञ, बालरोग तज्ज्ञ, क्ष किरण शास्त्र तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, श्वसनविकार तज्ज्ञ, अनुवंशशास्त्र तज्ज्ञ, रोगनिदान तज्ज्ञ, मेंदुविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे.
अशी राहिल वैद्यकीय मंडळाची जबाबदारी२० आठवड्यानंतरची गर्भपाताबाबतची जी प्रकरणे वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्यासाठी विद्यमान न्यायालयाकडून संदर्भीत होतील, त्या संदर्भात ७२ तासांच्या आत बैठक आयोजित करून संबंधित गरोदर मातेची तपासणी करावी.स्थायी वैद्यकीय मंडळाने तपासणी केलेल्या गरोदर मातेची स्थिती आणि वैद्यकीय गर्भपात करण्यासंबंधीचा अहवाल ४८ तासाच्या आत सीलबंद पाकिटात स्थायी वैद्यकीय मंडळाच्या अध्यक्षाने संबंधित न्यायालयात सादर करावा.गरोदरपण चालू ठेवल्यास सदर महिलेच्या जीवितास धोका होऊ शकतो का तसेच तिच्या शारीरिक व मानसिक स्थितीस गंभीर इजा पोहोचू शकते का, याबरोबरच जन्माला येणाऱ्या बाळाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर परिणाम होऊन बाळ गंभीररित्या दिव्यांग होण्याची शक्यता आहे का? आदी बाबी अहवाल पाठविण्यापूर्वी वैद्यकीय मंडळाला विचारात घ्याव्या लागतील.
गर्भपातसंदर्भात असलेल्या शासकीय नियमांची वाशिम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. आरोग्य संचालकांच्या मार्गदर्शक तत्वानुसार यासंदर्भात वाशिम जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाईल.- अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम