संतोष वानखडे
वाशिम : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता आमदारांनादेखील स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एक कोटी रुपये मयार्देत कोविड हॉस्पिटल, केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर यासह वैद्यकीय यंत्रसामग्री देता येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याला विलंब लागत आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीलादेखील फटका बसत असून, कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर येथे आणखी आवश्यक त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन विभागाने आता विधिमंडळ सदस्यांना अर्थात आमदारांना स्थानिक विकास निधीचा वापर करण्याची मुभा दिली आहे. जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ‘विशेष बाब’ म्हणून ‘वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य’ खरेदी करण्यासाठी आमदारांना एक कोटीपर्यंत निधी उपलब्ध करून देता येणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
या सुविधा उपलब्ध करता येतील..
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, ऑक्सिजन रेग्युलेटर्स व बायपॅप मशीन्स, हॉस्पिटल बेडस् तसेच आयसीयू बेडस्, व्हायटल साईन मॉनिटर्स, एनआयसीयू व्हेंटिलेटर्स, स्ट्रेचर्स, पेशंट ट्रॉली, इर्मजन्सी ट्रॉली, फार्मासिटिकल फ्रीज, व्हॅक्सिन बॉक्स, कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधनसामग्री.
०००
कोट बॉक्स
कोेरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढत आहे. राज्य शासनाने आमदारांना स्थानिक विकास निधीमधून एक कोटी रुपयापर्यंत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी एक कोटी रुपये देता येईल, असा स्तुत्य व स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. वाशिम जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल किंवा अन्य सरकारी दवाखान्यांत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली तर अवश्य आमदार निधीमधून निधी दिला जाईल.
- अमित झनक, आमदार