लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असून, ‘आरटी-पीसीआर’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिड पॉलिमरेज चैन रिअॅक्शन) वैद्यकीय प्रयोगशाळा उभारणीस शुक्रवारी मंजुरी मिळाली. जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात एक महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा साकारली जाईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने व्यक्त केला.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविणे आणि रुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणीकरीता प्रस्ताव सादर केला होता. शुक्रवारी याला हिरवी झेंडी मिळाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास दोन कोटींचा निधी मिळणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात या प्रयोगशाळेसाठी जागेची निश्चिती करण्यात आली. साधनसामुग्री आणि प्रशासकीय कार्यवाही यामध्ये जवळपास २० ते २२ दिवसांचा कालावधी जाऊ शकते, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली. एका महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा उभारून त्यानंतर जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे अहवाल तातडीने मिळतील. प्रयोगशाळा उभारणीसाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग पुढील कार्यवाही करीत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तपासणीसाठी स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा असावी यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व वरिष्ठांनी शासनाकडे पाठपुरावा केला. ‘आरटी-पीसीआर’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिड पॉलिमरेज चैन रिअॅक्शन) वैद्यकीय प्रयोगशाळा उभारणीस आता मंजुरी मिळाली असून, जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात एक महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा साकारली जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम