वाशिम : प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. परंतु या महिलेचे त्याच दिवशी वाशिम येथे जात असतांना रस्त्यात रुग्णवाहिकेत नॉर्मल प्रसृती झाली. यावर रुग्णांच्या नातेवाईकाने दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचा केलेला आरोप व ईतर बाबीच्या सखोल चौकशी संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सदर वैद्यकीय अधिकाऱ्यास शो-कॉज नोटीस बजावली व नंतर चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना पाठवून करण्यात आली. याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्त्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी दिली.रिसोड ग्रामीण रुग्णालयात ३१ जुलै रोजी प्रसृतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची थातूर-मातूर तपासणी परिचारिकांकडून करुन त्यावर वैद्यकीय अधिकाºयांनी सही मारुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करुन हात मोकळे केले. परंतु सदर रुग्ण गंभीर आहे तर त्याची रुग्णालयापासून १५ किलोमिटर अंतरावरील रुग्णवाहिकेतच नॉर्मल प्रसृती झाली , विशेष म्हणजे ज्यावेळी या रुग्णाला रेफर करण्यात आले त्यावेळी कर्तव्यावर असेलेले वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातचं हजर नव्हते, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती मिळताच लोकमतने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. सदर प्रकरण गंभीर असल्याने या वृत्ताची दखल जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेवून येथील वैद्यकीय अधिकारी चोपडे यांच्याशी चर्चा केली. व कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी धम्मपाल मोरे यांना याबाबत सविस्तर खुलासा मागितला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. हरण यांनी सदर चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना नेमले. डॉ. हेडाऊ यांनी रिसोड येथे जावून सदर प्रकरणाची चौकशी केली. यासंदर्भात निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, डॉ. हेडाऊ यांची चौकशी पूर्ण झाली असून सोमवारपर्यंत ते अहवाल सादर करणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची चौकशी निवासी वैद्यकीय अधिकारी यांचेकडे दिली आहे. त्यांनी रिसोड येथे जावून चौकशी केली असून अहवाल सादर करावयाचा आहे.
- डॉ. ए.व्ही. सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
रिसोड येथील रुग्णवाहिकेत महिलेच्या प्रसृती प्रकरणी डॉ. हेडाऊ यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल सोमवारपर्यंत येणार आहे. अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- डॉ. बालाजी हरण निवासी वैद्यकीय अधिकारी, वाशिम