लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांना विलंब होत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली.वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके तातडीने निकाली काढण्यासाठी शिक्षण विभाग, वित्त विभाग व आरोग्य विभागात समन्वय असणे गरजेचे आहे. मात्र, समन्वयाअभावी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके महिनोमहिने विविध विभागातच धूळखात राहतात. याचा फटका शिक्षक व शिक्षक कुटुंबियांना बसत आहे. या गंभीर बाबींकडे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी लक्ष देऊन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली. याबरोबरच सन २०१८ च्या आॅनलाईन बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या तसेच पती-पत्नी विभक्तीकरण झालेल्या शिक्षकांना समायोजनापूुर्वी विनंतीनुसार समुपदेशानाने रिक्त पदावर पदस्थापना द्यावी अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली. चटोपाध्याय वेतनश्रेणी, निवडश्रेणीचे प्रलंबित प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही करावी, अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली आहे. शिक्षण व शिक्षकांसंबंधीचे विविध प्रश्न निकाली काढण्याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, या मागणीची दखल तातडीने घेतली जात नसल्याने वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रलंबित राहाणे, आॅनलाईन बदल्यांमधील विस्थापित शिक्षकांना न्याय न मिळणे, चटोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रकरण प्रलंबित राहणे आदी प्रश्न अद्याप ‘जैसे थे’च राहत आहेत, असा आरोपही शिक्षक संघटनांनी केला.
वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकास विलंब; शिक्षक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:55 PM