कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मीना बाजार, विशेष बाजार आयोजित केले जातात. मात्र, सद्य:स्थितीत अशा प्रकारचे बाजार आयोजित केल्यास त्याठिकाणी गर्दी होऊन कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मीना बाजार व विशेष बाजार आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १४ एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.