नंदकिशाेर नारे, वाशिम: विभागीय आयुक्त वाशिम जिल्हा दाैऱ्यावर असतांना प्रकल्पग्रस्तांनी मांडलेल्या समस्यांबाबत बैठक घेण्याचे निर्देश विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले हाेते. त्यानुसार १२ सप्टेंबर राेजी जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक समस्यांसाठी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी वाकाटक सभागृह वाशीम येथे जम्बो बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकी संदर्भात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते. सर्वप्रथम वाशीम जिल्ह्यातील बैठक लावावी म्हणून संघटनेचेवतीने त्यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील अत्यंत कवडीमोल दराने सरळ खरेदी करण्यात आलेल्या जमीनी संदर्भात चर्चा करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोबतच स्थानिक पातळीवरील सिंचन प्रकल्पामुळे उद्भवलेल्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जागेवर जाऊन इत्थंभूत माहिती गोळा करुन समस्या सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांशी समन्वय साधून समस्या सोडविणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र वाटपासंदर्भात ठिकठिकाणी शिबीरे घेऊन जाग्यावर प्रमाणपत्र वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रकल्पग्रस्तांची चिंतन सभा काळे लॉन येथे घेण्यात आली. यावेळीही शेकडो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती.