लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १ आॅगस्ट २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आपली परिपूर्ण प्रकरणे २३ जुलैपर्यंत महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन सादर करावे तसेच बैठकीच्या दिवशी लाभार्थ्यांनी आधारकार्ड सोबत आणुन स्वत: हजर राहावे, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण यांनी केले.श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तलाठी अहवाल, २१ हजार रुपये उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला, ६५ वर्ष पुर्ण झाल्याबाबतचा पुरावा, रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खाते पुस्तक झेरॉक्स, ग्रामपंचायत, पोलिस पाटील रहीवाशी दाखला तसेच संजय गांधी योजने अंतर्गत अपंग, विधवा, परितक्ता यांनी आवश्यक पुरावे सोबत जोडणे आवश्यक आहे. उपरोक्त कागदपत्रे जोडून परिपूर्ण केलेला अर्ज महा ई सेवा केंद्रामार्फत २३ जुलैपर्यंत आॅनलाईन सादर करावेत. तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. सबंधित लाभार्थ्यांनी बाहेरील व्यक्तीशी संपर्क न साधता संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या फलकावरील अध्यक्ष, सदस्य यांच्या भ्रमणध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटून सविस्तर माहिती घ्यावी व संभाव्य फसवणूक टाळावी, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण हे राहणार आहे. बैठकीला तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार नप्ते, सदस्य विनोद मगर, प्रल्हाद गोरे, गजानन गोटे, भगवान कोतीवार, पवन जोगदंड, कल्पना खामकर, सिध्दार्थ इंगोले आदींची उपस्थिती राहणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेची १ आॅगस्टला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:40 PM