वाशिम: कारंजा तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार वितरणात सातत्य नसणे तसेच धुमका-बोराळा येथील एका खासगी शाळेच्या मुद्यावरून स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात २0 नोव्हेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, पानूताई जाधव व ज्योती गणेशपुरे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे यांनी कारंजा तालुक्यात काही ठिकाणी शालेय पोषण आहार वितरणात सातत्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. या आहाराचा दर्जा उत्कृष्ट नसल्याचे गारवे यांनी सभागृहाला सांगितले. याप्रकरणी चौकशी व पाहणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकार्यांना दिल्या. तसेच वाशिम तालुक्यातील धुमका-बोराळा परिसरात एका खासगी शाळेची परवानगी एका गावात असतानाही सदर शाळा दुसर्या गावात भरविली जात असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य रोकडे यांनी उपस्थित केला. हा प्रकार गंभीर असून, शिक्षणाधिकार्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी रोकडे यांनी लावून धरली. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना गणेश पाटील यांनी दिल्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा योजना प्रभावित होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा मुद्दा काही सदस्यांनी उपस्थित केला. यावरही चर्चा झाली. महागाईच्या काळात दुधाळ जनावरांसाठी देण्यात येणारे ४0 हजाराचे अनुदान अपुरे असल्याने, शासनाने ६0 हजार रुपये अनुदान द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने पारित केला.
शालेय पोषण आहारावरून स्थायी समितीची सभा गाजली
By admin | Published: November 21, 2015 2:01 AM