लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा : मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने राजुरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह चार सदस्यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, १५ जुलै रोजी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सचिव संजयराव घुगे यांनी दिली. मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या राजुरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढील सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना राजुरा ग्रामपंचायत सदस्य संजीवनी घुगे, दुर्गाबाई पुरुषोत्तम, संगीता अढाव, वसंता उत्तमराव कांबळे या चारही सदस्यांनी दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, संबंधितांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी, वाशिम यांनी ११ एप्रिल २0१७ रोजी दिला होता. त्याविरोधात वसंता कांबळे व दुर्गाबाई पुरुषोत्तम या दोन सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले होते. मात्र, आयुक्तांनी अपर जिल्हाधिकार्यांचा निर्णय कायम ठेवत चारही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचा आदेश मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी सचिव, ग्रामपंचायत राजुरा यांना १३ जुलै रोजी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये वार्ड क्र.१ व वार्ड क्र.२ मधील प्रत्येकी एक; तर वार्ड क्रमांक ३ मधील दोन सदस्यांचा समावेश असून, या निर्णयाने विद्यमान उपसरपंचही अपात्र ठरले आहेत. या निकालाने नऊ सदस्यसंख्या असलेल्या राजुरा ग्रामपंचायतमधील चार सदस्य अपात्र ठरल्याने राजुरा येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, याबाबत ग्रामस्थांमध्ये खमंग चर्चा होत आहे.
चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Published: July 16, 2017 2:14 AM