जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ २.२५ टक्केपर्यंत असून फक्त ९ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा समावेश राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात होत आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून १४ जून २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ११ जून रोजी निर्गमित केले आहेत. हे आदेश निर्गमित करताना काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले हाेते. परंतु जिल्ह्यात या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने नियमित सुरु राहतील. या दुकानांमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त ‘होम डिलिव्हरी’द्वारे वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी दुकानदारांनी नियोजन करावे. त्याकरिता दुकानदारांनी स्वतःचा व्हॉटसअॅप क्रमांक दर्शनी भागात प्रसिद्ध करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉटसअॅप क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे, अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, सभागृह, मंगल कार्यालये, लॉन, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी ठिकाणी दर्शनी भागात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ (मास्क नाही, प्रवेश नाही) असे बोर्ड, फलक लावून नागरिकांना कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करावे, असे आदेशात म्हटले आहे. परंतु या नियमांचे पालन हाेताना दिसून येत नाही. याकरिता प्रशासनाने ठाेस पावले उचलणे गरजेचे आहे.
----------------
व्यापाऱ्यांनी खबरदारी घ्या
जिल्ह्यात काेराेना संसर्ग कमी हाेत आहे याचा अर्थ ताे पूर्णपणे संपला असे नाही. नागरिकांनी तसेच दुकानदारांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मास्क नसल्यास ५०० रुपये दंड
काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याने जिल्ह्यात अनलाॅक करण्यात आले असले तरी मास्कचा वापर सर्वांनी करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.