वाशिम जिल्ह्यामधे नावारूपास आलेल्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हेतर, शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यामधूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादित पिकांची आवक दररोज होत असते. शेकडो वाहनांनी कृषी मालाची आवक होत असलेल्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दलाल, हमाल, खरेदीदार यांची न तुटणारी साखळी निर्माण झालेली असून ह्या त्रिकूटाचा प्रचंड त्रास येथे कृषिमाल विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने बसत असल्याची ओरड मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाकडून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी माल ठेवायला टिनपत्र्याचा शेड उभारण्यात आलेला असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कृषिमाल येत असल्याने आता विस्तारित बांधकामही करण्यात आलेले आहे. परंतु ह्या जुना व नवीन शेडमध्ये पूर्णपणे व्यापाऱ्यांनी कब्जा मिळविलेला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस, थंडी अंगावर काढून, जंगली श्वापदांपासून पिकाचे व स्वतःचे रक्षण करून लाखमोलाचा पिकविलेला कृषिमाल ठेवायला मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षित जागाही उपलब्ध नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोयाबीन विकायला आलेले प्रगतिशील शेतकरी गजानन पाटील यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांचा माल छताखाली तर शेतकऱ्यांचा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:44 AM