लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आॅनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ तसेच किरकोळ व्यापारात थेट परदेशी गुंतवणूकीस विरोध म्हणून २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्हयात व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यात झालेला करार आणि किरकोळ व्यापारात थेट १०० टक्के परदेशी गुंतवणूकीचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी आहेत, असा दावा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केला.वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यात झालेला करार व किरकोळ व्यापारात थेट शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूकीकरीता शासनाने परवानगी दिल्यामुळे ई कॉमर्सव्दारे सुईपासुन तयार होणारे कपडे, जोडे, चप्पल, कॉस्मेटीक, औषधी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्लास्टिक साहित्य आदिंचा व्यापार ठप्प होणार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी व शासनाला याची जाणीव करुन देण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत, असे कोठारी यांनी सांगितले. वाशिम शहरातील प्रमुख बाजारपेठेसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी पंचाईत झाली.कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्पजिल्ह्याभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याचा दावा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केला.
औषध विक्रेत्यांचाही संप
‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’, या संघटनेने औषधांच्या आॅनलाईन विक्रीला तीव्र विरोध दर्शवित शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याभरातील जवळपास ६२८ मेडिकल्स या बंदमध्ये सहभागी असल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी केला. केंद्रसरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषध विक्री करण्याचा दिलेला आदेश, ई-फार्मसीजना बिनधास्तपणे कार्य करण्याची दिलेली मुभा आदी बाबींचा निषेध नोंदविण्यासाठी हा बंद पुकारलेल्या आहे. या बंदमुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. जेनेरिक ‘मेडिकल्स’ सुरू!रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी बंदमध्ये सहभागी नसलेले जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शासकीय रुग्णालयांशी संबंधित औषध दुकाने सुरू आहेत. गरजू रुग्णांना औषध हवी असल्यास किंवा गैरसोय होत असल्यास जेनेरिक मेडीकल्स, शासकीय रुग्णालय किंवा अन्न व औषधी प्रशासन विभागाशी किंवा ९७३०१५५३७० या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन औषध निरिक्षक तथा सहायक आयुक्त (औषधे) एच. वाय. मेतकर यांनी केले.