शिरपूर जैन: पर्यावरणातील बदलांमुळे मानवी जीवनावर होत असलेल्या दुष्परिणामांची माहिती आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. यात शिरपूर येथील सुवर्णकार महिला मंडळानेही पुढाकार घेत गावांतील महिलांना विविध रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला, तसेच ही रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहनही केले.
शिरपूर येथील विश्वकर्मा संस्थानमध्ये सुवर्णकार महिला मंडळाच्यावतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांत सर्व महिलांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाजातील महिला, युवतींना आमंत्रित करून त्यांना विविध वृक्षांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. यामध्ये कडूनिंब, गुलमोहर, बेल, वटवृक्ष, आंबा, उंबर, निलगिरी, वृक्षांच्या रोपाचा समावेश होता. ही रोपे प्रशस्त जागेत लावून त्याचे प्राण्यांपासून संरक्षण करण्यासह नियमित पाणी घालून संवर्धन करण्याचे आवाहनही महिलांना करण्यात आले. सुनंदा सावळकर, वर्षा मुगवानकर, वैशाली गिरडे, गिता खंदारकर, विद्या धुडकेकर, शितल गिरडे, विद्या खंदारकर आदि महिलांनी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी त्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद देत दिलेली रोपे आनंदाने स्विकारून ती वाढविण्याचा संकल्प केला.