नंदकिशोर नारे, वाशिम : मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आता या आठवड्याच्या अखेर आणि पुढच्या आठवड्यात सुरुवातीला पुन्हा जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गतवर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीने गहू, हरभरा, तूर, कपाशीसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.
या नैसर्गिक आपत्तीनेही पिकांचे नुकसान झाले. आता जिल्ह्यात हरभरा आणि गहू पिकाची काढणी सुरू असताना पुन्हा एकदा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागांत रविवार आणि सोमवारी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरल्यास काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीवर आलेली पिके तातडीने कापणी करून घेण्याची गरज आहे.
रविवारसाठी यलो अलर्ट :
नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवार आणि सोमवारी काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. यात रविवार २५ फेब्रुवारीला जिल्ह्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. अर्थात रविवारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंब्याचा मोहोर धोक्यात :
यंदा जिल्ह्यात गावराण आंब्याचे वृक्ष मोहोराने लदबदले आहेत. त्यामुळे गावराण आंब्याची चव मोठ्या प्रमाणात चाखायला मिळण्याची शक्यता आहे. अशातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रविवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात झडण्याचीही शक्यता आहे.