वाशिम : वाशिम शहरातील नवीन आययूडीपी तसेच अन्य भागात मीटर रीडिंग नियमित घेतले जात नसल्याने ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. तीन महिन्यांतून एकदा मीटर रीडिंग घेतले जात असल्याचा प्रकार ग्राहकांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना कथन केल्यानंतर संबंधित एजन्सीला ताकीद दिल्याचे त्यांनी सांगितले.
वीजवापरानुसार प्रत्येक ग्राहकाला देयकाची आकारणी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला २२ ते २४ तारखेदरम्यान मीटर रीडिंग घेणे आवश्यक असून, एजन्सीची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. मात्र, नवीन आययूडीपीसह शहरातील अनेक भागात मीटर रीडिंग नियमित घेतले जात नसल्याने ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. नवीन आययूडीपी भागातील काही ग्राहकांचे जानेवारी २०२१ पासून मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. तीन महिन्यांनंतर २१ एप्रिल रोजी एजन्सीचे संबंधित कर्मचारी हे मीटर रीडिंग घेण्यासाठी आले असता, ग्राहकांनी त्यांना जाब विचारला. मीटरची ऑनलाइन नोंद झाली नसल्याने मीटर रीडिंग घेतले नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याबाबत मीटरची ऑनलाइन नोंद झालेली आहे, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केल्याने संबंधित एजन्सीच्या कर्मचा-यांचा खोटारडेपणा समोर आला. तीन महिन्यांतून एकदा मीटर रीडिंग घेण्यात आल्याने युनिटची आकारणी कशी होणार, याची चिंता ग्राहकांना लागली आहे. नियमानुसार देयक आकारणी करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
०००
बॉक्स
चूक एजन्सीची; शिक्षा ग्राहकांना!
मीटर रीडिंग नियमित न घेणे ही चूक एजन्सीची असताना, शिक्षा मात्र ग्राहकांना मिळत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वीजदेयकाचा भरणा वेळेवर केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. याच धर्तीवर चूक करणा-या एजन्सीविरुद्ध नियमानुसार कारवाई झाली तर ग्राहकांमध्ये चांगला संदेश जाऊ शकतो. मीटर रीडिंग नियमित न घेणा-या एजन्सीविरुद्ध नेमकी कोणती कारवाई होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
०००००
मीटर रीडिंग नियमित न घेणा-या संबंधित एजन्सीची चौकशी करण्यात आली. मीटर रीडिंग नियमित घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीदेखील ताकीद दिलेली आहे. तीन महिन्यांतून एकदा मीटर रीडिंग घेतले असेल, तर महिनावार विभागणी करून देयक आकारले जाईल. ग्राहकांना भुर्दंड बसणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
- पी.के. चव्हाण
अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
महावितरण, वाशिम
००