वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसायांची वाणवा आहे. प्रामुख्याने शेतीआधारित कामांवर जिल्ह्यातील ७० टक्के कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यातही जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्रच अधिक असल्याने खरीप हंगामानंतर रोजगाराची समस्या गंभीर होते. परिणामी, कामगारांना रोजगारासाठी परराज्यात, महानगरात स्थलांतर करावे लागते. कामगार कुटुंबांसह स्थलांतर करीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही सातत्याने परिणाम होतो. आता खरीप हंगामातील कामे आटोपली असून, रब्बी हंगामात शेतात हरभरा काढणीशिवाय दुसरे कोणतेही काम उरले नाही. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगारांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हजारो कामगारांनी घराला कुलूप ठोकून मुलाबाळांसह परराज्यात, महानगराकडे प्रस्थान केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-----------
वस्त्या पडू लागल्या ओस
जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने हजारो मजुरांनी रोजगारासाठी परराज्यात किंवा महानगरात धाव घेतली आहे. त्यामुळे विविध गावांतील वस्त्याच ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रोजगाराच्या शोधात गेलेल्या कामगारांनी घराला टाळेच लावले आहे. त्यामुळे या वस्त्यांत शुकशुकाट दिसत आहे. या ओस पडलेल्या वस्त्यात चिटपाखरूही आढळून येत नाही. अशात या वस्त्यांतून अवैध धंद्यांना किंवा गुन्हेगारीला वाव मिळण्याची शक्यताही असते.
------------
प्रशासनाकडे नोंद नाही
रोजगारासाठी परराज्यात किंवा परजिल्ह्यात होणाऱ्या स्थलांतरांतून विविध समस्याही उद्भवतात. त्यात स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होत असून, काहीवेळा परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. शिवाय आपत्कालीन स्थितीत या कामगारांना आपल्या घराकडे परतणेही कठीण होते. त्यामुळे अशा कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून तशी नोंदच घेतली जात नाही.
-----------
लॉकडाऊन काळात परतले होते ८० हजार कामगार
देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जारी केले, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद केली. त्यात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडल्याने परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळी आली होती. त्यामुळे हजारो कामगारांनी त्यांच्या चिमुकल्यांसह हजारो, शेकडो किलोमीटरचा प्रवास रानावनातून, उन्हातान्हातून पायीच केल्याचे चित्रही दिसले. गतवर्षी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करेपर्यंत ८० हजार कामगार जिल्ह्यात परतले होते.
===Photopath===
140121\14wsm_1_14012021_35.jpg
===Caption===
खरीप हंगाम संपताच मजुरांचे स्थलांतर