मानोरा : १४ एकर शेती बटाईने करून गहू व हरभऱ्याचे पीक घेतले असता त्याच शेतामधील कुटार पेटवून दिल्यामुळे शेती उपयोगी साहित्य व गहू पीक जळाल्यामुळे कुपटा येथील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना ३० मार्च रोजी घडली.
अमोल वसंतराव श्यामसुंदर यांच्या फिर्यादीनुसार माझ्या मालकीची चार एकर शेती असून त्यामध्ये गहू पीक घेत आहे. माझ्या शेजारीच प्रतापराव देशमुख यांची १४ एकर शेतजमीन बटाईने केली, त्या शेतीमधील आरोपी कमलाबाई शामराव भारसागळे हिने कुटार पेटवून दिले. आगीत शेतामध्ये ठेवलेले ९० नग प्लास्टिक पाईप जळून ९० हजार रुपये, ५० क्विंटल गहू किंमत ५० हजार, इलेक्ट्रिक वायर २०० फूट किंमत ५ हजार रुपये असे एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची फिर्याद देण्यात आली.
मानोरा पोलिसांनी आरोपी कमलाबाई शामराव भारसाकडे यांच्याविरुद्ध कलम ४३५ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास मानोरा पोलीस करीत आहेत.